वाळू तस्कराने तलाठ्याच्या कारवर घातली हायवा

Foto
जांबरगाव शिवारातील घटना, एअरबॅग उघडल्याने वाचला जीव, कार मात्र चक्काचूर
वैजापूर (प्रतिनिधी) : वाळू चोरी विरोधात कारवाई करण्यास गेलेल्या तलाठ्याच्या कारवर वाळू तस्काराने हायवा घातला. यात कारमधील एअरबॅग उघडल्याने तलाठ्यासह त्यांच्या सहकाऱ्यांचा जीव वाचला. जांबरगाव शिवारात २० मेच्या मध्यरात्रीनंतर ही धरारक घटना घडली.

याबाबत शिऊर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी मांडकी सज्जाचे तलाठी अमरसिंग तेजराव बावनकर (रा. खोपडा, ता. तिरोडा, जि. गोंदिया) हे २० मे च्या मध्यरात्री १२.४० वाजेच्या सुमारास गौणखनिज पथकासह शिवना नदी परिसरातील गावांमध्ये अवैध वाळू उपसा व वाहतुकीवर नियंत्रण ठेवण्यासाठी गस्त घालत होते.

दरम्यान, जांबरखेडा ते लाखणी रोडवर निवृत्ती बारसे यांच्या शेताजवळ संशयित वाहनांची तपासणी सुरू असताना आरोपी शिवनाथ विश्वनाथ लंबे (रा. जांबरखेडा ता. वैजापूर) याने टाटा कंपनीची हायवा (एमएच २० जीझेड ६७०६) तलाठी अमरसिंग बावनकर यांच्या कारला (एमएच ३५ एआर ०४६१) समोरून धडकावली. 

यात कार तब्बल ५० फूट फरपटत गेली, तिचा चक्काचूर झाला. धडकेनंतर कारमधील एअरबॅग उघडल्यामुळे तलाठी बावनकर व त्यांच्या सहकाऱ्यांचे प्राण वाचल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले. या प्रकरणी २१ मे रोजी शिऊर पोलीसठाण्यात हायवा चालक लंबे विरोधात जीवे मारण्याचा प्रयत्न, शासकीय कामात अडथळा आणि मालमत्तेचे नुकसान केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास सपोनिरणखांब यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.